आरोग्य सल्ला

आरोग्य सल्ला - [Health Tips] Get Free Health Tips(अरोग्य सल्ला) in Marathi Language from Experienced Doctors.


केसांची निगा आणि सौंदर्य





ही दशकांपूर्वी आपल्याकडे केशवपनाची चाल होती. स्त्री विधवा झाली की, तिचं केशवपन करण्यात येई. उद्देश असा की, विधवा कुरुप दिसावी. यावरून स्त्रीसौंदर्यात केसांना किती महत्त्व आहे हे कळून येतं. केसांशिवाय स्त्री ही कल्पनाच असह्य होते. यासाठी केसांची निगा राखणं अगत्याच आहे.
मानव हा फॅशनप्रिय प्राणी आहे. त्यातल्या त्यात स्त्रियांचा फॅशन हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. केसांची विविध आणि कलापूर्ण रचना स्त्रिया अनादिकालापासून करीत आल्या आहेत. अजंठा वेरूळ येथील पुराण शिल्प यांचे बोलकं उदाहरण आहे. नितंबापर्यंत रुळणार काळेभोर केस आपल्याला आकर्षित करतात, तसेच मानेपर्यंत रुळणारे सोनेरी केस, गोरांगीचे सौंदर्य खुलवितात. डोक्यावरील केस स्त्रियांचा निसर्गदत्त अनमोल ठेवा आहे. प्रत्येक स्त्री, मग ती श्रीमंत असो किंवा गरीब असो, तरुणी असो वा प्रौढा असो ती आपापल्या ऐपतीप्रमाणे आपल्या केसांची यथायोग्य निगा राखते.
केस म्हणजे काय ?
वैद्यकीय दृष्ट्या केस आपल्या त्वचेचाच एक भाग आहे. केस आणि नखे केराटीन नावाच्या पाण्यात न विरघळणाऱ्या प्रथिनापासून तयार होतात. प्रत्येक केसाचे मूळ आंतरात्वचेमध्ये रुजलेले असते. फक्त केसांचे मूल सजीव असते व बाकी भाग निर्जीव असतो. यामुळेच केस कापले तरी दुखत नाहीत आणि रक्तही येत नाही. केसांच्या मुळापासून पेशी वरवर येतात आणि या पेशीपासून केस तयार होतात. आपल्या शरीरावरील केसांचे काही प्रकार आहेत. नवजात अर्भकाच्या अंगावर दिसणारे केस कालांतराने गळून पडतात. हात पाय, ओठ वगैरे भाग वगळता आपल्या शरीरावर मऊ मुलायम फिकट सोनेरी अशी लव असते. डोक्यावर मात्र गडद रंगाचे जाड आणि राठ केस असतात. केस गळून पडताना, विशेषतः टक्कल पडण्याच्या वेळी आपल्या डोक्यावरील केस मऊ आणि बारीक होतात आणि सरतेशेवटी गळून पडत असतात. किशोरावस्थेतून यौवनात विशिष्ट जागेवरील लव राठ जाड व काळसर दिसू लागते.
वरून ढोबळमानानं पाहिल्यास डोक्यावरचे केस सारखेच वाटतात. परंतु सूक्ष्मदर्शक यंत्रानं पाहिल्यास केसामध्ये अनेक फरक दिसतात. चपटे केस, बांबूसारखे वाटाणारे, आड्या किंवा उभा छेद गेलेले केस वगैरे. बहुधा केसाच्या एका मुळांपासून एकच केस बाहेर येतो. कधी कधी मात्र एकाच मुळातून दोन किंवा अधिक केस उगवलेले दिसतात.
केसांची निगा :
काळाभोर लांबसडक केशसंभार सर्वांनाच आवडतो. परंतु केस जितके लांब असतील तितकेच ते जीर्ण झालेले असतात हे ऐकून लोक आश्चर्यचकित होतात. केस जितके लांब तितकीच त्यांची निगा राखणं कठीण काम असतं. नाहीतर केसांचा गुंता होऊन केस तुटू लागतात किंवा केस एकत्र घट्ट चिकटून त्यांच्या जटा होऊ लागतात. केस व दाढी न कापणारे व त्यांची देखभाल न करणारे साधू यांच्या केसांच्या जटा झालेल्या आपण पाहातोच.
केस आणि आहार :
ज्यांचे शरीर सुदृढ आणि निकोप असते त्यांचे केस तजेलदार असतात. निकोप शरीराकरिता समतोल आहार घ्यावा लागतो. प्रथिनं योग्य प्रमाणात न मिळाल्यास केसांचा तजेलदारपणा आणि रंग कमी होऊन ते गळून पडतात. उपासमारीनं देखील असं होऊ शकतं. यथायोग्य प्रमाणात सर्व जीवनसत्त्वं आपल्याला आवश्यक असतात. केसांना देखील त्यांची गरज भासते. त्यातल्यात्यात ए, ई आणि बी-५ या जीवनसत्त्वांचा आणि केसांचा घनिष्ट संबंध आहे.
डोक्यावरील केसांची वाढ व्हावी, ते तजेलदार आणि भरघोस व्हावेत याकरिता बाजारात विविध प्रकारची केशवर्धक तेल आणि टॉनिक्स उपलब्ध आहेत. आपल्या मालाचा खप वाढावा याकरिता या कंपन्या आकर्षक जाहिराती देत असतात. वानगीदाखल एकच उदाहरण देतो. ‘आमचं केशवर्धक तेल चुकून टॉवेलवर पडलं आणि टॉवेलचं कांबळ झालं !’ सर्वसामान्य जनता अशा जाहिरातींना बळी पडते. शास्त्रीयदृष्ट्या असं कोणतंही केशवर्धक तेल अस्तित्वात नाही. कुठचंही तेल बोटांवर घेऊन डोक्यावरील त्वचेला हळूवार मालिश केल्यानं केसांच्या मुळाशी रक्तप्रवाह थोडासा वाढतो त्यामुळे कदाचित केस सशक्त होत असतील आणि त्यांची वाढ लवकर होत असेल, हा एक अंदाज आहे.
केसातील कोंडा :
प्रत्येकाच्या डोक्यात कमी अधिक प्रमाणात कोंडा होत असतो. हे नैसर्गिक आहे, विकार नाही. थोड्या प्रमाणात होणारा कोंडा डोके नियमित धुतल्यानं निघून जातो. त्यावर औषधोपचार करण्याची गरज नसते. काही स्त्रियांना कोंड्याचा त्रास मोठ्या प्रमाणात होतो. अशा स्त्रियांनी डोके आठवड्यातून किमान दोन वेळेला धुवावे. डोक्यावर तेल लावू नये. कोंडा अधिक वाढल्यास त्यापासून डोक्यावर खवडा होऊन त्यामुळे केस गळू लागतात. डोके धूण्याकरिता रिठा, शिकेकाई आणि शॉम्पू यांचा नेहमी वापर करतात. सेलीनियम सल्फाइडमुक्त शॉम्पू हा कोंडा कमी करण्याचा उत्त्म मार्ग होय. प्रथिन शॉम्पू किंवा एगशॅम्पू या महागड्या शॉम्पूपेक्षा साधा शॉम्पू किंवा रिठा आणि शिकेकाई सर्व सामान्य जनतेला तितकीच उपयोगी पडतात. कोंडा वरचेवर होत असतो. त्यामुळे डोके वारंवार धुवावे लागते. कोंडा होण्याचं प्रमाण वयोमानाप्रमाणं कमी होत जात. डोके वेळोवेळी धुतल्यानंतर देखील कोंडा काही ठिकाणी डोक्यावर चिकटून असतो. अशावेळेला केस कापून बारीक करणे हितावह असते. चिकटून बसलेला कोंडा विरघळून टाकण्याकरिता त्वचारोग तज्ज्ञ काही विशिष्ट औषधं देत असतात.
आपल्या डोक्यावरील अगणित केस एका ठराविक चक्रात फिरत असतात. वाढणारे केस, स्थितप्रज्ञ केस आणि गळून पडणारे केस असे हे चक्र असते आणि प्रत्येक केस या फेरीतून जात असतो. डोक्यांवरील ९० टक्के केस रो ०.३५ मि.मि या वेगानं वाधत असतात. तर १० टक्के केस स्थितप्रज्ञ अवस्थेमध्ये असतात. एक टक्का किंबहुना त्याहूनही कमी केस गळण्याच्या मार्गी दिसून येतात. शास्त्रीय पाहाणीमध्ये असं आढळून आलं आहे की, आपले केस ३ ते ७ वर्षांपर्यंत वाढत असतात. ३ महिने स्थितप्रज्ञ बनतात. आणि २ आठवडे गळण्याच्या अवस्थेमध्ये दिसतात. केसाचं असं चक्र आहे आणि म्हणूनच आपले केस कापले नाहीत, तरीसुद्धा त्यांची लांबी नितंबापर्यंत क्वचितच पोहोचते. तसंच केसांच्या चक्रातील गळणारे केस रोज साधारणपणे २०-४० पर्यंत गळून पडतात. यानं विचलीत होण्याच कारण नाही. हे नैसर्गिक आहे आणि गळलेले हे केस परत उगवतात.
स्त्रियांच्या मासिक पाळीत नेहमीपेक्षा जास्त केस गळतात. प्रसूती नंतर किंवा दीर्घ मुदतीच्या तापानंतर साधारणपणे ३-६ महिन्यांनी अचानक खूप प्रमाणात केस गळून पडतात. याचं कारण वाढण्याच्या स्थितीत असलेले बरेचसे केस आपला मार्ग बदलून गळण्याच्या मार्गाला लागतात. परंतु या केसांची मुळे शाबुत राहिल्यास हे केस नंतर दिसू लागतात हे सुद्धा नैसर्गिक आहे.
केसांचे इतर विकार :
डोक्यावर होणारा खबडा, बुरशीचे रोग, पुवाने भरलेले खांडके यामुळे केस गळतात आणि टक्कल दिसू लागते. शरीरामध्ये फोफावत असलेल्या कर्करोगासारख्या रोगांमुळे डोक्यावरील केस कमी होऊ लागतात. या सर्व रोगांवर उचित उपाय केल्यानंतर हे रोग बरे होतात आणि नंतर केस पुन्हा उगवू लागतात.पुंजक्या पुंजक्याने केस गळण्याचा आणखी एक प्रकार आहे. ठराविक भागातील सर्वच केस गेल्याने तिथं टक्कल पडतं. शरीरामध्ये काही बिघाड झाल्यास असा प्रकार होण्याची शक्यता असते. बऱ्याच वेळा असा काही बिघाड दिसून येत नाही. तरीसुद्धा केस गळून पडतात. योग्य उपचारानंतर पडलेलं टक्कल केसांनी भरून येते.डोक्यावरील कातडी अग्नीमुळे भाजल्यानंतर, क्ष किरणे अमर्यादित दिल्याने किंवा डोक्यावर होणाऱ्या गंभीर आजारानंतर देखील केस गळून पडतात. या प्रकारामध्ये कातडीबरोबरच केसांचे समूळ उच्चाटन होतं आणि केस परत येऊ शकत नाहीत. अशा प्रकारामुळे पडलेले टक्कल केसाम्चा टोप वापरून किंवा केशारोपण (Hair Transplant) करून झाकता येतं.
स्त्रियांना नकोसे वाटणारे केस :
डोक्यावरील केस कमी झाल्यास युवतीला जेवढी काळजी वाटते (नको असलेले केस काढण्याचे अनेक उपाय असतात आपल्याला सोयीस्कर आणि अपाय न होणारा उपाय प्रत्येकीने काळजीपूर्वक निवडून मगच नको असलेले केस काढावेत ) त्यापेक्षा कितीतरी पट अधिक काळजी नको त्या ठिकाणी केस दिसू लागल्यास वाटू लागते. ही ठिकाण म्हणजे वरचा ओठ, हनुवटी आणि छाती, या ठिकाणी जी लव असते तिचा रंग गडद होतो, ती राठ होते आणि लांब होते. यामुळे स्त्रिया ‘पुरुषी’ दिसू लागतात. असे केस दिसू लागल्यानंतर स्त्रियांना समाजात वावरणं कठीण होतं त्या एकलकोंड्या बनतात. तर काही स्त्रिया आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात. अशा स्त्रियांचं प्रदर्शन करून धंदेवाईक लोक कमाई करतात. सामान्य जनतेला त्याचं कुतूहल वाटतं. शास्त्रज्ञांना याची जिज्ञासा आहे. एक आव्हान आहे.
३० टक्के स्त्रियांमध्ये असे नकोसे वाटणारे केस, कमी अधिक प्रमाणात आढळतात. हे वाचून काहींना दिलासा वाटेल, तर काही जणांना नवाल वाटेल. परंतु हे सत्य आहे. नकोसे वाढणारे केस कधी कधी एकाच ठिकाणी दिसतात. उदाहरणार्थ, हनुवटीवरील केस, एखाद्याच ठिकाणी उगवणारे केस, मार लागल्याने वारंवार होणाऱ्या घर्षणामुळं, रसायनं, तसेच अंतःस्त्राव (हार्मोन्स) यामुळे उगवू शकतात. मज्जासंस्थाचे रोग अंतःस्त्राव पिंडींचे (Endocrin glands) आणि इतर काही रोग यामुळे देईल ओठ, अनुवटी, छाती, हात, आणि पाय येथे पुरुषाप्रमाणे स्त्रियांचे केस दिसू लागतात. उपासमारीनं आणि कॉरटीझोनसारख्या काही औषधांनी देखील असे केस दिसू लागतात. स्त्रियांच्या शरीरात ठराविक वेळेला स्थित्यंतरं होत असतात. मासिक स्त्राव सुरू होताना, गर्भारपणी, तसंच मासिकपाळी बंद होताना असे बदल होत असतात. अंतःस्त्रावामुळे होणारे बदल, यामुळंच अशी स्थत्यंतरे होत असतात. अशावेळी देखील स्त्रियांना नकोसे वाटणारे केस ओठ, हनुवटी, छाती इत्यादी भागावर स्पष्ट दिसू लागतात. ‘सुदैवानं’ अंतःस्त्रावाची समतोलता काही काळानं नैसर्गिकरीत्या स्थिरावते व नकोसे वाटणारे केस अस्पष्ट होतात.
नको असलेले केसांवरचे उपाय :
नकोसे वाटणारे केस दिसू लागल्यास काही स्त्रिया भयंकर व्यथित होतात आणि त्यांच्या डोक्यात नको ते विचार घोळू लागतात. काही अविचारी करण्यापूर्वी अशा स्त्रियांनी त्वचारोग तज्ज्ञांचा जरूर सल्ला घ्यावा. ते योग्य मार्गदर्शन करू शकतील. नकोसे वाटणारे केस नष्ट करण्याचे काही उपाय खालीलप्रमाणे आहेत.
(१) कात्रीनं किंवा रेझरन केस कापणं :
हा उपाय सोपा आहे. पण यामुळे केस राठ होण्याची शक्यता असते. केस एकदा कापल्यानंतर हा प्रकार पुनः पुन्हा करावा लागतो. बऱ्याच वृद्धा हा सोपा मार्ग अवलंबितात.
(२) रसायने वापरून केस नष्ट करणे :
डिपिलेटींग किंवा एपिलेटींग क्रीम्स किंवा साबण बाजारात उपलब्ध आहेत. या रसायनांनी केस विरघळतात. परंतु मुळाला धक्का पोहोचत नाही. केस पुन्हा उगवतो व हा उपायही पुनः पुन्हा करावा लागतो. काही जणींना या रसायनांपासून अ‍ॅलर्जी होते आणि त्यामुळे त्वचेलाही इजा पोहोचण्याची शक्यता असते.
(३) केस मुळासकट उपटणे :
बारीक चिमट्यानं, ट्रिवझरनं  (Tweezer)  नको असलेले  केस उपटता येतात. अनुभवी लोक या प्रकारानं केस मुळासकट काढू शकतात. फक्त केस उपटल्यास मुळापासून केस पुन्हा उगवतो आणि केस परत उपटावा लागतो. भुवयांचे केस काढण्याकरिता किंवा भुवयांना योग्य आकार देण्याकरीता थ्रेडिंग करतात. दोऱ्याला पीळ देऊन त्यामध्ये भुवयांचे केस पकडून उपटले जातात. हातपायावरील केस काढण्याचा वॅक्सींग हा एक प्रकार आहे. केसाळ भागावर मेणासारख द्रव्य ( हे बाजारात उपलब्ध आहे. ) फासलं जातं. तलम कपड्यानं हा भाग झाकतात. काही वेळानंतर लावलेलं द्रव्य सुकतं आणि केस व कपड्याला चिकटतं. अशावेळी हा तलम कपडा केस उगवण्याच्या विरुद्ध दिशेनं पटकन खेचून काढतात. क्षणार्धात केस उपटले जातात.
(४) ब्लिचिंग :
हायड्रोजन पेरॉक्सॉइड किंवा इतर रासायनिक द्रव्ये नको असलेल्या केसांना लावल्याने केसांचा गडद रंग फिका पडतो, व कातडीशी मिळता जुळता होतो आणि त्यामुळे हे केस चटकन उटून दिसत नाहीत.
(५) इलेक्टोलायसिस :
केसांच्या मुळांपर्यंत विद्युत प्रवाह सोडून केस कायमचे नष्ट करण्याचा एक चांगला उपाय आहे. परंतु या उपायानंतर काही स्त्रियांच्या केस काढलेल्या जागेवर खडबडीत पुटकुळ्या दिसतात आणि ‘भीक नको पण कुत्रा आवर’ असे म्हणण्याची पाळी येते.
नको असलेले केस नष्ट करण्याचे काही उपाय हे असे आहेत. सर्वांनाच हे उपाय लागू पडतील असे नव्हे. ज्यानं त्यानं आपल्याला सोईस्कर असा प्रकार निवडावा हे उत्तम.
केसांचे सौंदर्य :
केसांच्या सौंदर्यांच्या व्याख्या स्थळी काळी बदलतात. भरपूर लांबसडक काळेभोर केस आपण सौंदर्यात लक्षण समजतो. इंग्लिश लोकांना सोनेरी केसांचे आकर्षण असतं. युरोपियन स्त्री आपले सरळसोट केस चिमटे लावून कुरळे करून घेते. या उलट निग्रो स्त्रियांना त्यांचे कुरळे केस नको होतात आणि त्या आपले कुरळे केस सरळ करवून घेतात. केस लांब असले तर उत्तमच, नपेक्षा केसांचा विग लावून स्त्रिया आकर्षक केशभूषा करीत असतात. आपण आपली वेशभूषा रोज बदलतो त्याचप्रमाणे अमेरिकन युवती रोज निरनिराळ्या रंगाच्या आणि विविध आकाराच्या केसांचा टोप वापरते. आपल्याकडील सिनेतारका असे टोप वापरताना दिसतात.

प्रत्येक स्त्रीला आपण चिरतरुण दिसावं असं वाटतं. केस पांढरे होणे हे वार्धक्याचे लक्षण होय. बऱ्याचवेळा ऐन तारुण्यात देखील केस पांढरे होऊ लागतात. अशावेळी कलप लावून केस काळे करता येतात. कलप निरनिराळ्या प्रकारचे आणि रंगाचे असताट. कलप पावडर द्रवरूप किंवा शॉम्पू या प्रकारांनी बाजारात मिळतात. आपणास योग्य असा कलप गरजूंनी निवडावा कलप लावल्यानं काही लोकांना अ‍ॅलर्जी होते. तसंच कातडीला अपाय होण्याचा संभव असतो. केसांना मेंदी लावून पिंगट करणे हासुद्धा कलपाचाच एक प्रकार होय. केसांचं हे माहात्म्य संपवण्यापूर्वी हे सुचित करावसं वाटतं की, मानवाच्या शरीराला केस नकोशी वाटणारी वस्तू आहे. मानवाचा पूर्वज गोरिला याच्या सर्वांगावर केस आहेत. मानवाची जसजशी उत्क्रांती होत गेली तसतसे त्याच्या अंगावरील केस गळून पडले आणि या उत्क्रांतीची झळ डोक्याच्या केसापर्यंत पोहोचली आहे. शास्त्रंज्ञांच्या मते भावी मानवाच्या केवळ शरीरावरीलच नव्हेत, तर डोक्यावरील केसदेखील संपूर्ण गेलेलेअसतील !


बाळंतपण एक गोड वेदना






बाळंतपण म्हणजे स्त्रियांचा दुसरा जन्मच असं म्हटलं जातं. पण गर्भवतीनं योग्य काळजी घेतली तर बाळंतपणातील वेदनांचं रूपांतर गोड संवेदनात होऊ शकेल. कोणताही ‘पण’ म्हटले की त्यात श्रम, कष्ट हे आलेच. पण त्या पणातून पार पडल्यानंतरचा आनंद हा काही आगळाच असतो. ‘पण’ जिंकण्यासाठी खूपच कष्ट, त्रास सहन करावा लागतो. त्यातून मिळणार समाधान हे चिरकालीन सुख देणारं असतं. अगदी तसंच आहे बाळंतपण बाळपण याविषयी.परंतु बाळंतपणातील या ‘पणा’ विषयी भीती बाळगण्याचे काहीच कारण नाही. सध्याच्या या विकसीत विज्ञान युगात गर्भारपणात रोग खूपच लवकर कळू शकतात. यामुळे त्यावर उपाय योजनाही वेळेवर करता येते. मात्र यासाठी गर्भारपणात किंवा बाळपणात घ्यावयाच्या काळजीची माहिती असणे आवश्यक आहे.
दिवस गेल्यानंतर घ्यावयाची काळजी
पाळी चुकल्यानंतर प्रथम डॉक्टरकडून तपासणी करून दिवस (बाळाच्या भुमिकेतून आईचे संगोपन !) गेल्याची खात्री करून घेणं आवश्यक ठरतं. म्हणजे दिवस गेल्यानंतरच्या आहार विहार, कष्टाची कामं, पती पत्नी संबंध या सारख्या गोष्टीविषयी सल्ला घेता येतो. गरोदरपणात वेळोवेळी डॉक्टरकडून तपासणी करून घेणं आवश्यक आहे.
ताबडतोब डॉक्टरी सल्ला केव्हा घ्यावा ?
  • जास्त प्रमाणात उलट्या होणं.
  • चक्कर येणं
  • फार अशक्तपणा वाटणं.
  • अंगावर पांढरे पाणी किंवा लाल जाणं.
  • पोटात दुखणं
  • कंबर एकसारखी दुखणं.
  • लघवीचा त्रास होणं.
वरील लक्षणं निर्माण झाल्यास ताबडतोब डॉक्टरी सल्ला घ्यावा. शेवटच्या पाळीची तारीख माहिती असणं आवश्यक आहे. साधरणपणे त्या दिलेल्या तारखेच्या ७ दिवस अलिकडे किंवा पलीकडे ७० ते ८० टक्के  स्त्रियांचं बाळंतपण होतं. बाळंपणाची तारीख माहिती असली म्हणजे प्रवास, रजा, घर सांभाळण किंवा मुलांना सांभाळणं अशा गोष्टींची व्यवस्था करता येते.
खेड्यतील स्त्रियांसाठी
सर्व खेड्यांमध्ये डॉक्टरची सोय होणं कठीण असतं. त्यामुळॆ गरोदरपणी वेळोवेळी तपासणी करून घेणं अवघड जातं. तरीसुद्धा गरोदरपणी विशेषता ७ व्या महिन्यानंतर दोनदा किंवा निदान एकदातरी डॉक्टरकडून तपासणी करून घ्यावी. यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, कॉटेज हॉस्पिटल अशा दवाखान्याची सोय निदान तालुक्याच्या गावी तरी सामान्यतः असते. यामुळे बाळंतपण घरी होणे शक्य आहे का ? याचा अंदाज येतो. तसेच शरीरामध्ये असणाऱ्या रक्ताचं प्रमाण, रक्ताचा गट, लघवी इत्यादी तपासण्या करून घेणं आवश्यक आहे.
हॉस्पिटलमध्ये बाळंतपण आवश्यक
  • पूर्वीचे बाळंतपण सिझेरियन करून झालेले असेल तर प्रत्येक वेळी सिझेरियनच करावं लागेल असं नसतं. नॉर्मल बाळंतपण होऊ शकतं. परंतु अशावेळी पूर्वीच्या गर्भाशयातील व्रण उकळण्याचा संभव असतो. असा धोका निर्माण झाल्यास परत सिझेरियन करून बाळ बाळंतीण वाचवणं हॉस्पिटलमध्ये शक्य होतं. हीच गोष्ट पूर्वी गर्भाशयावर शस्त्रक्रिया झालेल्या स्त्रियांच्यासाठीही आहे.
  • आर. एच. निगेटिव्ह रक्तगट असलेल्या स्त्रियांना गरोदरपणात ठराविक वेळी रक्ताची तपासणी करून घेणं आवश्यक असते. तसंच आपल्या ओळ्खीपैकी रक्ताचा गट निगेटिव्ह असलेली हेरून ठेवावी लागते. वेळ पडल्यास अशा व्यक्तींकडून रक्त मिळवता यायला हवं. जन्मणाऱ्या मुलाच्या दृष्टीनं, तसच बाळंतीणीच्या दृष्टीनं हॉस्पिटलमध्ये अशा स्त्रियांचं बाळंतपण होणे अत्यंत आवश्यक असतं.
  • पूर्वीच्या बाळंतपणात जर वार पडण्यास त्रास झाला  असेल किंवा अंगावरून खूपच गेले असेल, तर त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यत दुसऱ्या वेळी खूप असते. यासाठीच अशा स्त्रियांच बाळंतपण हॉस्पिटलमध्ये केल्यास हा संभाव्य धोका टळू शकतो.
  • पूर्वीच्या बाळंतपणानंतर मूल लगेच गेले असेल तर नीट चिकित्सा करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये बाळंतपणाची सोय करावी.
  • घरी बाळंतपण करताना जर खूप वेळ गेल्यावरही बाळंतपण होण्याची चिन्हे दिसत नसतील तर ताबडतोब हॉस्पिटलमध्ये हलवावे. खूप वेळपर्यंत घरी थांबू नये.
बाळंतपणाची मानसिक तयारी
पहिलटकरणीच्या बाळंतपणात सामान्यपणे १० ते १२ तास लागतात. कळा येणं, अंगावर पांढर जाणं, कंबर दुखणं अशा लक्षणांनी पहिलटकरनी घाबरून जातात. परंतु बाळंतपणाआधी याची माहिती करून मानसिक तयारी झाली असेल, तर उगीचच मानसिक ताण पडत नाही. मन शांत असेल तर येणाऱ्या कळासुद्धा सुसूत्र व चांगल्या येतात. म्हणून स्त्रियांनी बाळंतपणाआधी याची माहिती करून घ्यावी.


आई बाळाचे संगोपन


दिवस राह्ल्यापासून मूल मोठं होईपर्यंत त्याची सर्वार्थाने काळजी घेणारी आईच असते. बाळाचा सर्वांगीण विकास घडविताना काय करावं लागतं ? कोणती पथ्य पाळावी लागतात ? आरोग्याची व्याख्या ही वर्षावर्षाला बदलत आली आहे आणि आज आपण आरोग्याची व्याख्या अशी करतो - शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकास, रोग व्याधी मुक्त असे आनंदी बालपण आणि सृजनशील प्रौढात्व म्हणजे आरोग्य होय. ही व्याख्या जर पालकांनी विशेषतः मातांनी समजावून घेतली, तर आदर्श माता कशी असावी हे समजणं फारसं अवघड नाही.
आपण गर्भवती आहोत या गोष्टीचा स्त्रीला आनंद व्हायला हवा. तिनं गर्भारपणातही आनंदी मोकळ्या मनानं राहायला हवं. बाळाचं आगमन तिच्या आयुष्यातला महत्त्वाचा क्षण असतो. तो क्षण यशस्वी होण्याच्या दृष्टीनं सर्वांगीण तयारी करायला हवी. गर्भाची संपूर्ण वाढ होण्याच्या दृष्टीनं तिनं मनावर आणि शरीरावर कोणताही ताण पडून देता कामा नये, प्रथिने, खनिजे, कॅलरीज आणि जीवनसत्त्व योग्य प्रमाणात मिळतील असा आहार तिनं गर्भारपणात घ्यायला हवा. दूध, फळे, पालेभाज्या असा आहार उत्तम. तसंच मांसाहार करणाऱ्या स्त्रियांनी अंडी, मांस, मासे या काळात आपल्या आहारात घेत जावे.
आवश्यकतेपेक्षा जास्त आहार आणि पोषणाला अयोग्य असं अन्न खाण्यात आलं तर अपचन होत असतं. गर्भारपणी अपचन होऊ न देण्याची खबरदारी गर्भवती स्त्रियांनी घेणं आवश्यक असतं. ज्या ठिकाणी नाना तऱ्हेच्या माणसांशी बराच काळ संपर्क येऊ शकतो, अशा ठिकाणी गर्भवतींनी जाण्याचं टाळावं. सिनेमागृह हे असं ठिकाण असतं की तिथं रोज हजारो माणसं येत असतात. तीन तास बसत असतात. ही येणारी माणसं कुठल्यातरी विकारांनी आजारी असू शकतात. कुणाला सर्दी, खोकला तर कुणाला गुप्तरोगासारखे विकार झाले असण्याची शक्यता असते. अशा ठिकाणी तीन तास बसणं हे गर्भवती स्त्रीच्या दृष्टीनं अपायकारक ठरू शकतं. त्यापेक्षा मोकळ्या हवेत फिरणं उद्यानात बसणं ठीक. डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतंही औषध गरोदर स्त्रीनं घेऊ नये. ते धोकादायक असतं एवढंच नाही, तर त्या काळात ओटीपोट दुखतं म्हणून किंवा आत हालचाल होऊन त्रास होतो म्हणून ओटीपोट दाबणं किंवा त्याला मसाज करणंही अत्यंत अयोग्य असतं.
आपल्या होणाऱ्या बाळाला जास्तीत जास्त काळपर्यंत अंगावरचं दूध पाजण्याची तयारी आईनं दाखवायला हवी. जर अशी मनाची तयारी झालेली असेल, तर मग दूध कमी येण्याची तक्रारच उद्भवणार नाही. डॉक्टर आणि नर्स सांगतील त्याप्रमाणं आपल्या स्तनाग्रांची तिनं काळजी घेतली पाहिजे. नियमितपणे तपासणी, योग्य पथ्यपाणी, कोणत्याही संसर्गापासून दूर राहणं, शरीरावर तसंच मनावर कोणत्याही प्रकारचा ताण येऊ न देणं, अतिरिक्त धूम्रपान आणि मद्यसेवन न करणं, अशा तऱ्हेनं स्त्रीनं गर्भारपणाच्या काळात काळजी घेतली तर गर्भाची सर्वांगीण वाढ होण्याच्या दृष्टीनं चांगलीच मदत होते. मुख्य म्हणजे बाळंतपण हे सुसज्ज अशा इस्पितळात किंवा निष्णात डॉक्टरांकडेच करणं हेही अत्यंत महत्त्वाचं असतं. बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याचा सर्वांगीण बाजुंनी शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकास होण्यासाठी आणि हा विकास, ही वाढ कोणत्याही रोगविकाराची बाधा न होऊ देता होण्यासाठी आईनं बऱ्याच गोष्टी लक्षपूर्वक आणि कटाक्षानं पाळायला हव्यात.

गर्भारपण


सुदृढ, सशक्त व हुशार मुले ही ज्याप्रमाणे आई वडिलांचा तसेच समाजाला आधार असतात, त्याचप्रमाणे देशाची खरी संपत्ती असतात अशी मुले ही घडवावी लागतात. त्यांची योग्य ती शारिरीकव मानसिक घडण घडविण्यासाठी आई-वडिलांच्या प्रेमाचे व आधाराचे छत्र अत्यंत जरुरी असते त्याचबरोबर प्राथमिक वैद्यकीय ज्ञानसुद्धा अत्यंत उपयोगी पडते.
मुलाला जन्म देण्याच्या पद्धतीत स्त्री ही चार अवस्थेतून जाते. पूर्वगर्भावस्था. गर्भावस्था. प्रसूती अवस्था. सुतिकावस्था.
पूर्वगर्भावस्था : 
लग्नानंतरचा परंतु गर्भावस्थेच्या आधीचा काळ म्हणजे पूर्वगर्भावस्था ही एक महत्त्वाची स्थिती आहे. ह्या स्थितीकडे स्त्रीची शारीरिक व मानसिक तयारी केली जाते. काही शारीरिक रोग (हृदयरोग, मधुमेह, क्षय, रक्तक्षय) तसेच मानसिक रोगांसाठी स्त्रीची तपासणी केली जाते. अशापैकी कुठलाही रोग आढळून आल्यास त्याचा शक्यतोवर इलाज केला जातो काही शारीरिक रोगात किंवा मानसिक रोगामध्ये जर रोग पराकाष्ठेला पोहचला असता तर अशा स्थितीत गर्भवतीला शारिरीक व मानसिक विकारांचा धोका असतो.
गर्भावस्था
गर्भधारणेपासून ते प्रसूतीपर्यंतचा काळ असतो, त्याला गर्भावस्था म्हणतात. सामान्यपणे गर्भावस्थेची मुदत ९ महिने व ७ दिवस एवढी असते. किंवा साधारण २८० दिवस एवढी असते. गर्भावस्था ही स्थिती डॉक्टर आणि गर्भारीण या दोघांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची स्थिती आहे. प्रसुतीमध्ये उद्‌भवणाऱ्या बऱ्याच अडचणींचा आढावा गर्भावस्थेत घेता येतो व त्याचा योग्य तो इलाज करूनशक्य तो अडचणी टाळता येतात किंवा त्यासाठी योग्य ती पूर्व तयारी करता येते.
प्रसूतीपूर्व तपासणी :
स्त्रीस जेव्हा प्रथम गर्भार होणाची जाणीव होते. त्यावेळेस लगेच डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे योग्य असते. कारण गर्भावस्थेमध्ये ठारावि काळाच्या अंतराने स्त्रिची तपासनी होते . तिच्या गर्भाची वादतसेच गर्भास्थेमध्ये आढळू येणारे रोग यांचा बारकाईने अभ्यास केला जातो. अर्भकाची वाढ, गर्भाशयाची चाढ, प्रसूती मार्गाचा तपास व रक्तगट, रक्तदाब, मधुमेह तसंच प्रसूती मार्गात असणारे अडथळे वगेरे गोष्टींचा अंदाज डॉक्टरांना येतो.
गर्भवतीच्या जबाबदाऱ्या :
आहार
गर्भावस्थेत आहाराचे महत्त्व अधिक आहे. काही तज्ञांनी गर्भवती स्त्री व मूल ह्यांच्या आहाराविषयी परस्परांशी संबंध पारखताना मुलाला आईचं बांडगुळ म्हणून संबोधले आहे ही कल्पना जरी बऱ्या आयांना अजिबात रुचणारी नसती तरीसुद्धा याचा अर्थ एवढाच आहे की, मूल हे आईवर सगळ्याच दृष्टीने निर्भरित असते व त्यामुळे आई व मूल ह्या दोघांच्या आरोग्यासाठी आवश्यक तो आहार घेण्यात जबाबदारी आईवर असते.
साधारणरित्या गर्भवस्थेत स्त्रीच्या आहाराची गरज वीस टक्क्यांनी वाढते. आहार हा एकावेळी थोड असावा, परंतु थोड्या थोड्या अंतराने घ्यावा. आहार हा पौष्टिक व पचण्यास हलका असावा. खूप तिखट, तळलेले पदार्थ, उघड्यावरील पदार्थ शक्यतोवर टाळावेत रोज साधारण १ लीटर दूध अवश्य प्यावे. त्यामुळे रोजचे आवश्यक तेवढे प्रोटीन्स आणि कॅल्शियम मिळण्यास मदत होते. जर दूध आवडत नसल्यास दूधाचा कोठलाही पदार्थ घेण्यास हरकत नाही. पण रोजचे कमीत कमी १ लीटर दूध किंवा दूधाचा कोणताही पदार्थ घेणे आवश्यक आहे.
जर गर्भवती स्त्री अंडी व मांसाहार घेत असेल तर चांगला शिजवलेला व कमी तिखट असा आहार उच्चप्रतीचे प्रोटीन्स देण्यास फार उपयुक्त होतो. ह्याबरोबरच ६० ते ६५ ग्रॅम चरबी ( Fats )आणि ३०० ते ३५० ग्रॅम पिष्टमयपदार्थ ( कार्बोहायड्रेटस ) हे आवश्यक आहेत. मुबलक प्रमाणांत फळांचा रस, हिरव्या पालेभाज्या घेतल्यास यातून व्हिटॅमिन व खनीजे मिळतात. मुबलक प्रमाणात प्रवाही पदार्थ, पाणी अत्यावश्यक असते. साधारण २ लीटर पाणी व थोडेसे मीठ हे दिवसभरात घेणे आवश्यक आहे. गर्भवती स्त्रीने उपास-तापास, डाएटींग वगैरे कधीही करू नये. कारण त्याचे अनिष्ठ परिणाम होतात ते नंतर आई व मुलाला भोगावे लागतात.
दातांची निगा
दातांची योग्य ती काळजी घेणे अगत्याचे असते. दिवसातूनच कमीत कमी दोनदा रात्री झोपताना व सकाळी दात घासावे. दातांना कीड लागली असल्यास लगेच त्यासाठी योग्य ते उपचार करावेत. हिरड्यांना रोज सकाळी व रात्री मालीश करणे व खाल्ल्यानंतर गुळण्या करण्याची सवय लावून घेणे हे उत्तम.
मलित्सर्ग
रोज मलोत्सर्ग ठराविक वेळी करणे आवश्यक आहे. त्यासाठी मुबलक प्रमाणात भाज्या, फळे आणि पाणी आवश्यक आहे. जर मलोत्सर्ग नियमीत होत नसेल किंवा मलबद्धाचा त्रास असेल तर त्यासाठी मुबलक पाणी, फळे, पालेभाज्या यांचा जेवणात उपयोग करावा. जर त्यांनीसुद्धा फरक वाटला नाही तर इसबगोल, ऍग्रोलचा उपयोग करावा. भरपूर खजूर खावा. अंजीराचे सरबत उत्तम. जुलाबाचे ओषध शक्यतो टाळावे. मलोत्सर्गासाठी भारतीय पद्धतीचे संडास अधिक बरे असे प्रस्तूत तज्ञांचे मत आहे.
व्यायाम
व्यायाम हा हलका असावा. साधारपणे चालण्याचा व्यायाम असावा. वजने उचलणे तसेच पळापळीचे व्यायाम टाळावेत. घरातील हलकी कामे ९ व्या महिन्याच्या शेवटपर्यंत करण्यास हरकत नाही. गर्भार स्त्रीस प्रसववेदनाच्या वेळी ज्याप्रमाणे जोर करून मुलाला प्रसूतीमार्गाच्या बाहेर पडण्यास मदत करते त्या प्रकारच्या व्यायामची सवय गर्भवती स्त्रीस करणे ही प्रसूती लवकर होण्यास लाभदायी ठरते.
वैयक्तिक आरोग्य
रोज आंघोळ करणे, हलके, सैल व स्वच्छ कपडे घालणे आवश्यक असते. बाह्य जननेन्द्रीय पाण्याने धूवून पुसून कोरडी ठेवावीत.
स्तनांची निगा
रोज सकाळी आंघोळीच्या वेळेस स्तन व स्तनाग्रे स्वच्छ धुवावीत. काही स्त्रियांचे स्तनाग्र आत दबलेले असतात अशा परिस्थितीमध्ये प्रसूतीनंतर मुलाला स्तनपान करणे कठीण जाते म्हणून रोज आंघोळीच्या वेळेस आत दबलेले स्तनाग्र असल्यास त्यांना मसाज करून बाहेर प्रक्षेपित करावी. अंगठा व तर्जनी यामध्ये धरून कमीत कमी ७-८ वेळा फिरवावी. जर स्तनाग्रावर जखमा, खाचा असल्यास त्यात मलम लावावे. ब्रेसीयर्स ह्या साधारणपणे कापडाच्या असाव्यात. तसेच फार घट्ट न बसणाऱ्या पण स्तनांना आधार देण्यास योग्य असाव्यात.
संभोग
पहिले ५ महिने संभोग टाळावा कारण या काळात संभोग केल्याने गर्भपाताची शक्यता वाढते. तसेच शेवटचे २ महिने संबंध टाळावा. कारण योनीमार्गातील जंतू गर्भाशयापर्यंत जाण्याचा धोका असतो. मधील काळात संबंध ठेवण्याचा झाल्यास दर १५ दिवसात एखाद्यावेळीच ठेवणे योग्य आहे.
गर्भावस्थेचे किरकोळ आजार
गर्भवती स्त्रीस ही जाणीव करून द्यावयास हवी की, गर्भावस्था ही आरोग्याची एक निशाणी आहे तो रोग नव्हे.
मळमळणे व ओकाऱ्या
साधारण पन्नास टक्के गर्भवती स्त्रियामध्ये मळमळणे व ओकाऱ्या आढळून येतात. अशा ओकाऱ्याचे कारण जास्त करून मानसिक असते. ओकाऱ्या सर्व गर्भवती स्त्रियांना होतातच असे नाही, पण जर जास्त त्रास होत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे इष्ट. ओकाऱ्या चालू असेपर्यंत गर्भवतीस्त्रियांनी स्वयंपाक न केलेला बरा. गोडपदार्थ, आईस्क्रिम वगैरे जास्त खावे.
छातीत जळजळणे
बऱ्याच गर्भार स्त्रियात छातीत जळजळणे आढळते. सर्वसाधारणपणे न जळजळण्यासाठी तिखट पदार्थ वर्ज्य करावेत. थंड दूध दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यावे. जळजळणे थांबले नाहीच तर ऍटांसीड घ्याव्यात. मलबद्धाचा त्रास असेल तर त्यासाठी आधी नमूद केल्याप्रमाणे उपाय करावेत.
डोकेदुखी, चक्कर येणेहे सर्वसाधारणपणे रक्तातील साखरेचे (ग्लुकोजचे) प्रमाण कमी झाल्याने होते. याचा इलाज म्हणून थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने काही ना काही गोड पदार्थ तोंडात टाकावा.
झोप न येणे
हा एक त्रासदायक अनुभव आहे. दुपारचे कमी झोपावे. रात्री झोपताना एक ग्लास दूध प्यावे. हलकी फुलकी पुस्तके वाचावी. कधी कधी नातेवाईक व पतीची सहानुभूतीच पुरेशी असते. जरूर पडल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे झोपेची औषधे घेण्यास हरकत नाही. पायात गोळे येणे हासुद्धा त्रासदायक अनुभव आहे. पायात गोळा येणे सर्वसाधारणपणे रात्री जास्त होते. जास्त त्रास होत असल्यास कॅल्शियम व व्हिटॅमिन बी आणि बी ६ इंजेक्शन उपयोगी पडतात.
पाठ दुखणे
साधारणपणे हॉरमोन्समधल्या फरकामुळे बऱ्याच गर्भवती स्त्रियांची पाठ दुखते. विश्रांती, पाठीचा मसाज कमरपट्टा व औषधे यामुळे बराच फरक पडतो. गर्भावस्थेदरम्यान गर्भाशय व प्रसूतीमार्गाचा रक्तपुरवठा वाढतो व त्यामुळे प्रसूतीमार्गातील स्त्रावामध्ये वाढ होते. हा स्त्राव जर साधारण असेल तर ह्यासाठी इलाजाची गरज नाही. पण जर स्त्राव खूप होत असेल तर मात्र तज्ज्ञांचा सल्ला घेणे इष्ट आहे.
वरील गोष्टींचा एकंदरीत विचार करता असे आढळून येईल, की नियमीत प्रसूतीपूर्व जतनामुळे गर्भवतीला स्वतःमध्ये आत्मविश्वास वाटू लागतो. असा आत्मविश्वास स्त्रीचे मन व आरोग्य चांगले ठेवण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरतो. गर्भावस्थेत उद्भवणाऱ्या अडचणींची आधी चाहूल घेऊन त्याप्रमाणे इलाज केल्यास प्रसूतीसुद्धा चांगली व सुरळीत होऊ शकते. अशा प्रसूतीपूर्व जतनाची व्यवस्था साधारणपणे सर्वच मोठ्या हॉस्पिटलात असते. तिचा सदुपयोग करून घेणे हे आपल्याच हातात आहे व आपल्याला अत्यंत हिताचेही आहे.


भोजनातील हानिकारक संयोग



दुधा सोबत : दही, मीठ, आंबट वस्तु, चिंच, डांगर, मुळा, मुळ्यांची पाने, दोडका, बेल, आंबट फळे, सातु हानिकारक असतात. दुधात गूळ टाकून सेवन करू नये. फणस किंवा तळलेले पदार्थ पण दुधासोबत हानिकारक आहेत.
दह्या सोबत : खीर, दुध, पनीर, गरम जेवण, केळी, डांगर (खरबूज), मूळा इत्यादि घेऊ नये.
तुपा सोबत : थंड दुध, थंड पाणी समप्रमाणात मद्य हानिकारक असते.
मधा सोबत : मूळ, खरबूज, समप्रमाणात तूप, द्राक्षे, पावसाचे पाणी व गरम पाणी हानिकारक असतात.
फणसा नंतर : पान खाणे हानिकारक असते.
मुळ्या सोबत : गुळ खाणे नुकसानदायक असते.
खीरी सोबत : खिचडी, आंबट पदार्थ, फणस व सातु घेऊ नये.
गरम पाण्याबरोबर : मध घेऊ नये
थंड पाण्याबरोबर : शेंगदाणे, तूप, तेल, खरबूज, पेरु, जांभळे, काकडी, गरम दुध किंवा गरम भोजन घेऊ नये.
कलिंगडा बरोबर : पुदीना किंवा थंड पाणी घेऊ नये.
चहा सोबत : काकडी, थंड फळे किंवा थंड पाणी घेऊ नये.
माशा सोबत : दुध, उसाचा रस, मध, पाण्याच्या काठावर राहणाऱ्या पक्ष्यांचे मांस खाऊ नये.
मांस बरोबर : मध किंवा पनीर घेतल्याने पोट खराब होते.
गरम जेवणा बरोबर : थंड जेवण, थंड पेय हानिकारक असतात.
खरबुजा बरोबर : लसूण, मुळा, मुळ्यांची पाने, दुध किंवा दही नुकसानकारक असते.
तांबे, पीतळ, किंवा काश्याच्या भांड्यात ठेवलेल्या वस्तु उदा. तूप, तेल, ताक, लोणी, रसदार, भाज्या, इत्यादि विषाक्त होतात. अशा भांड्यात बराच वेळ ठेवलेला पदार्थ खाऊ नयेत. अ‍ॅल्यूमिनियम आणि प्लस्टिकच्या भांड्यात पातळ पदार्थ ठेवल्याने, उकळल्याने किंवा खाल्याने अनेक प्रकारचे रोग होऊ शकतात.


समतोल आहाराचे महत्त्व


समतोल आहाराचे महत्त्व - [Samatol Aaharache Mahatva] विविध वयोगटात समतोल आहार कसा असावा या संदर्भातील राजेश्वर टोणे यांचा लेख.
साजूक तूप, बदाम यासारखे पौष्टिक मानले गेलेले पदार्थ खाल्ले तरच शरीराचे उत्तम पोषण होते असे अनेकांना वाटते, परंतू निव्वळ पौष्टिक पदार्थ असलेला आहार संतुलित असतोच असे नाही.
आपल्या जेवणात भात, भाजी, भाकरी, पोळी, मटण असे अनेक अन्नपदार्थ असतात. याशिवाय दिवसभरात आपण तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ खातो या सर्व पदार्थांना एकत्रितणे ‘आहार’ म्हणतात.
अन्नपदार्थात रंगाने, रूपाने तसेच चवीने एकमेकांपासून भिन्न असतात, परंतु त्या सर्वांमध्ये पिष्टमय, प्रथिनयुक्त आणि स्निग्ध पदार्थ तसेच क्षार आणि जीवनसत्त्वे कमी अधिक प्रमाणात असतात.
तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी यामध्ये पिष्टमय पदार्थाचे प्रमाण अधिक असते. डाळी, मांस, दुध यामध्ये प्रथिनयुक्त पदार्थांचे प्रमाण अधिक असते. भुईमुग, करडई यासारख्या तेलबियांत स्निग्ध पदार्थाचे प्रमाण अधिक असते. पालेभाज्यांपासून आपणास क्षार आणि जीवनसत्त्वे मिळतात.
शरीराचे योग्य पोषण व्हावे, ते कार्यक्षम आणि निरोगी राहावे यासाठी कोणकोणते अन्नपदार्थ आहारात असावेत? शरीराला लागणारे सर्व अन्नघटक पुरेसे मिळतील, तसेच व्यक्तीच्या गरजेनुसार त्यांचे प्रमाण योग्य राहील असे निरनिराळे अन्नपदार्थ आहारात असायला हवेत. अशा आहाराला ‘संतुलीत आहार’ म्हणतात.
सर्व व्यक्तींची अन्नगरज एकसारखीच असते का? तुम्ही घरात एकत्र जेवायला बसता. तुम्ही, तुमचा दादा आणि तुमचे आजोबा यांच्या आहाराचे प्रमाण एकसारखे असते?
तुमचा दादा तुमच्याहून वयाने मोठा आहे. त्याच्या शरीराची वाढ झपाट्याने होत आहे. स्वाभाविकच त्याच्या आहाराचे प्रमाण अधिक आहे. तुमचे आजोबा वयाने तुमच्या दादाहून खूप मोठे आहेत, पण त्यांचा आहार तुमच्या दादाच्या आहारापेक्षा खूप कमी आहे. वयस्कर माणसे कष्टाची कामे करत नाहीत. त्यांच्या शरीराची वाढही थांबलेली असते, म्हणून त्यांचा आहार बेताचा असतो.
वाढत्या वयाच्या मुलांच्या तुलनेत वाढत्या वयाच्या मुलींचा आहार कमी असतो असे काही जणांना वाटते, परंतू मुलगा किंवा मुलगी यांची अन्नगरज एकसारखीच असते.

No comments:

Post a Comment